रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू….. जोर कमी असला तरी अधून मधून पावसाच्या सरी ……


रायगड (खास प्रतिनिधी):रायगड जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरूच असून जोर काहीसा कमी झाला आहे. अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. महाड तालुक्यातील सावित्री नदीची पाणीपातळी घटल्याने महाडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र माणगाव शहरातील परिस्थिती अजूनही पूर्ववत झालेली नाही. बामणोली रोडवर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून नागरिकांनी उभी करून ठेवलेली अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत.

हवामान खात्याने आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासन हायअलर्टवर असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज सलग सहाव्या दिवशी पावसाची जोरदार संततधार सुरू असली तरी परिस्थिती धोकादायक नाही. महाड व नागोठणे येथील पुराचे पाणी ओसरले असून नद्यांच्या पाणीपातळीत कालच्या तुलनेत घट झाली आहे. सावित्री आणि अंबा नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत. तथापि, रोहा येथील कुंडलिका नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहत आहे.

एकूणच, जोरदार पावसाचा तडाखा सहन करत असला तरी रायगड जिल्ह्यातील परिस्थिती अंशतः स्थिर होत आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.