रायगड (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण व पूरप्रवण भागांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व विभागप्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. नद्यांची पातळी इशारास्तरावर पोहोचल्याने खबरदारीचे उपाय आणि पर्यायी व्यवस्था तपासून घेण्यात आली.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तहसीलदारांना आवश्यक सुविधा व साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच स्थलांतर, मदत व बचाव कार्य तातडीने करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बंदर व बांधकाम विभागांना विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यासच घराबाहेर पडावे, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी स्पष्ट केले. सर्व शासकीय विभागांनी योग्य समन्वय साधून “अलर्ट मोड” वर कार्य करावे, असे आदेश देण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.