अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील आरसीएफ वसाहतीतील विशेष मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना गोंधळपाडा येथील हॉटेल ताजने खास निमंत्रित करुन त्यांचा आगळावेगळा पाहुणचार केला. या पाहुणचाराने सारेच सुखावले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आत्मनिर्भर पालक असोसिएशन संचलित विशेष मुलांचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र आरसीएफ कॉलनी अलिबाग येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता संपन्न झाला. यावेळी शाळेचे पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी हजर होते. या मुलांना समाजाच्या विविध गोष्टींमध्ये सामावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतूने ताज अलिबाग रिसॉर्ट अँन्ड स्पा यांच्याकडून भेट देण्याचे आमंत्रण आले आणि मुलांच्या व शिक्षकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक इतर सहाय्यक व पदाधिकारी यांनी प्रथमच पंचतारांकित हॉटेलला भेट देत तेथील पाहुणचाराचा आनंद लुटला.
प्रथमताज रिसॉर्टचे जनरल मॅनेजर अनंत गड्डाला यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सुरक्षारक्षकांची परेड झाली. आत्मनिर्भर पालक असोसिएशनचे अध्यक्ष विनायक देशपांडे यांनी शाळेविषयी प्रस्तावना सांगितली. त्यानंतर शाळेचा विद्यार्थी रोहित धुमाळ याने डान्स सादर केला. ‘ये मेरे वतन के लोगो’ या गीताने सांगता झाली. सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला. सर्व ताज रिसॉर्ट मुलांना दाखवण्यात आले . अनंत गड्डाला यांनी शाळेतील मुलांना मदत करण्याची मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली. या सर्व आयोजनामध्ये सिक्युरिटी आणि सेफ्टी मॅनेजर किशोर रानवडे व चीफ इंजिनिअर प्रशांत तायडे यांचे योगदान लाभले.
************
विशेष मुलांसाठी ताज रिसॉर्टने राबवलेला हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय होता. संस्थेच्यावतीने आम्ही विविध उपक्रम राबवून विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्थांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.
-विनायक देशपांडे, अध्यक्ष, आत्मनिर्भर पालक असोसिएशन