रायगड (खास प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांचा ओघ अपेक्षित आहे. या प्रवासादरम्यान भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष तयारी केली असून २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत महामार्गावरील १० ठिकाणी आरोग्य पथके कार्यरत राहणार आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके स्थापन करण्यात आली आहेत.
गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी ठिकाणांहून हजारो चाकरमानी आपल्या गावी परतीचा प्रवास करतात. या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढते. तसेच प्रवाशांना अचानक वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे आरोग्य विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या आरोग्य पथकांमध्ये दिवस-रात्र एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेविका, एक आरोग्य कर्मचारी आणि एक वाहनचालक तैनात असतील. प्रत्येक पथकाला आवश्यक ती प्राथमिक औषधोपचार सामग्री तसेच रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकतील.
या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना आरोग्य सुविधेत कोणतीही कमतरता भासणार नाही, याची खात्री आरोग्य विभागाने घेतली आहे. “प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आरोग्य पथके सज्ज आहेत,” अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी दिली.
आरोग्य पथके स्थापन करण्यात येणारी ठिकाणे
खारपाडा (जिते), खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड (मोपराब्रिज), महाड एमआयडीसी (टोलफाटा), पोलादपूर (लोहारमाळ)