रा.जि.प.मध्ये २५ हजारांच्या लाचखोरी प्रकरणात तिघांना रंगेहाथ अटक


वित्त विभागातील आशिष कांबळे, शिपाई दिलीप कावजी व विलास ढेबे गजाआड

 अलिबाग (प्रतिनिधी): जलजिवन मिशन कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाचे ठेकेदाराचे बिल मंजूरीची स्वाक्षरी करण्याकरिता 25 हजार रुपयांची लाच स्विकारताना रायगड जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागातील कनिष्ठ सहाय्यक आशिष मदन कांबळे, शिपाई दिलीप रामचंद्र कावजी आणि खासगी व्यक्ती विलास भिकाजी ढेबे या तिघांना रायगड लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच सापळा रचून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ अटक केली आहे. यामुळे रायगड जिल्हा परिषदेतील भष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पेण तालुक्यातील सापोली ग्रामपंचायत हद्दतील शेणे नळ पाणी पुरवठा योजनेच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कामाचा ठेका तक्रारदारांना मिळाला होता. तक्रारदाराकडे वित्त विभागातील शिपाई दिलीप रामचंद्र कावजी (वय 56) याने या कामाचे ६९ लाखाचे बिलावर मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांचेकडून मंजूरीची स्वाक्षरी घेणेकरीता ३५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास मान्य केले होते. याची तक्रार तक्रारदाराने रायगड लाचलुचपत विभागाकडे केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची खातरजमा करुन पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने, शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात सापळा लावला. यावेळी शिपाई दिलीप कावजी याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारून, ती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक कांबळे यांचेकडे दिली. त्यानंतर कांबळे यांनी रक्कम मोजून विलास ढेबे यांच्याकडे दिली. यावेळी शिपाई दिलीप कावजी, कनिष्ठ सहाय्यक आशिष कांबळे आणि विलास ढेबे या तिघांना रंगेहाथ अटक करुन लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या लाचखोरांना २३ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार दिनांक २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.