आरोग्य आपल्या दारीचा लाभ घ्या….. राजाभाई केणी


अलिबाग (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या १५ ऑगस्ट या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी “आरोग्य आपल्या दारी – फिरता डिजिटल दवाखाना” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हेल्थ राशी मशीनच्या माध्यमातून तब्बल 100 तपासण्या मोफत करण्यात येणार असून, कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा फिरता दवाखाना पोहोचणार आहे.
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२५ पासून गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत हे आरोग्य तपासणी शिबिर नागरिकांसाठी खुले राहणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना केवळ पाच मिनिटांत तपासणीचे रिपोर्ट मिळणार आहेत. यामुळे आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार वेळेत सुरू करता येतील.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, हिमोग्लोबिन, वजन, तापमान तसेच इतर चाचण्या मोफत केल्या जातील.
“गावोगावी फिरता दवाखाना पोहोचल्यामुळे नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येकाने या सेवांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.