अजून असे किती दिवस पूर्वजांनी केलेल्या कामाचे धिंडोरे पिटवणार?


शेकापक्षाला राजेशाहीत राहण्याची, लोकांवर रोब दाखविण्याची, अनेक कार्यकर्त्यांना नोकरासारखी वागणूक देण्याची, केलेल्या उपकाराच्या बदल्यात त्यांना गडी म्हणून राबविण्याची सवय लागली आहे. आत्ता हातातून सत्ता निसटत चालली आहे नव्हे तर पूर्णतः च रस्त्यावर आला आहात म्हणून शेवटचे पंख फडफडविण्याचे काम करू नका. इतक्या वर्षे लोकांची दिशाभूल केलीत आणि स्वतःचे खिसे भरून अब्जावधी पैसा जमाकरून परदेशात स्वतःचे कारखाने टाकलेत. हे देखील लोकांना माहीत आहे. आदरणीय नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, ॲड.दत्ता पाटील यांनी त्यावेळी केलेले कार्य आम्हालाही ज्ञात आहे. त्यासाठी  त्यांची नावे आजदेखील आम्ही आदराने घेतो. पण आत्ता तिसरी चौथी पिढी आली तरीही त्यांच्याच कुबड्या घेऊन अजून किती दिवस पूर्वजांनी केलेल्या कामाचे धिंडोरे पिटवणार आहात? शेकापच्या काळात कंपनी सुरू झाली ती कशी झाली आणि कोणी कंत्राट मिळविले आणि कोणी कोणाला लुटले? किती घेतले  आणि किती खाल्ले? हे पण सर्वांनाच माहीत आहे. त्यावेळेला शेकापच्या वर नमूद केलेल्या नेत्यांनी आपल्या कामातून जनसामान्यांच्या मनात घर केले होते. त्यांनी लोकांना चांगल्या भावनेतून रोजगार दिला, नोकऱ्या दिल्या पण पुढे काय झाले? हे पण लोकांना चांगलेच माहीत आहे. ज्यांना नोकऱ्या दिल्या त्यांना सळो की पळो करून सोडलेत. नोकरासारखे वागवलेत, घरगडी बनवलेत, त्यांच्यावर अन्याय केलात, त्यांना दबावाखाली ठेवलेत, त्यांच्या नावावर लाखो रुपये कर्ज काढून त्यांना देशोधडीला लावलेत, आज ज्यांना नोकरीला लावले त्यांची मुले आईबापाचे हाल पाहून आणि शेकापचा जाच पाहून आज शेकापच्या विरोधात उभे राहून  त्यांची गुलामी नको म्हणून आमच्यासोबत आहेत. हे देखील लोकांना माहीत आहे. भूतकाळात जगण्याचे सोडा आत्ता भविष्यकाळात जगायला शिका. कुबड्या वापरायच्या बंद करा आणि तुमची स्वतःची कामे दाखवा? राजेशाहीत सत्ता उपभोगलेल्यांना गरिबी काय असते याची जाणीव ती कशी असेल? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो तरीही शेकापच्या नाकावर टिच्चून त्यांची सत्ता उलथवून लावण्याची धमक ठेवतो. लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे आणि करेन. लोकांच्या मनात राज्य करतो, डोक्यात नाही. जनसामान्यांचे प्रश्न जवळून पाहतो आणि सोडविण्याचा प्रयत्न करतो. स्वतः केलेल्या कामांतून जनसामान्यांचा  विश्वास जिंकला, आया बहिणींचे आशीर्वाद घेत आहे. तुमच्या सारखा पूर्वजांच्या कुबड्या घेऊन धिंडोरे पिटवत बसत नाही. तरुण वर्गाला रोजगार हवाय तुमची गुलामी नको. आत्ता जेव्हा मोठ्या संख्येने पाठिंबा देणाऱ्या लोकांची संख्या पाहिलीत तेव्हा आपलं काही शिजणार नाही हे एव्हाना तुमच्या लक्षात आले म्हणून बाजू सावरण्याचे ढोंग बंद करा. प्रदूषणाच्या एका मुद्द्यावर बोंबलत बसू नका. आम्हीही काही छक्के पंजे खेळत नाही, कंपनीच्या व्यवस्थापक मंडळींसोबत शहानिशा करून, प्रदूषणावर नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने pollution control technology, green belt, zero liquid discharge policy, effluent treatment plant(ETP), बॅग फिल्टर्स, स्क्रबर्स, वॉटर स्प्रिंकलर्स, साउंड बॅरियर्स यांच्या सहाय्याने प्रदूषण कसे रोखले जाईल यावर चर्चा करूनच आम्ही पाठिंबा दिला आहे. औद्योगीकरण झाले तरच गाव सुधारतील तरुणांना रोजगार मिळेल, बाजारपेठांना चालना मिळेल, गरिबाच्या हाताला काम मिळेल, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल, छोटे मोठे उद्योग वाढतील हे महत्त्वाचे मुद्दे तर तुमच्या लक्षातच येत नाहीत आणि फक्त एकच प्रदूषणाचा मुद्दा धरून जनसामान्यांची दिशाभूल करू पाहताय. पण आत्ता जनता विचार करते आणि आपले हित कशात आहे हे जाणते. त्यामुळे तुम्ही आत्ता जास्त जनतेचा विचार नका करू. तुम्ही स्वतः चा विचार करा. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मी स्वतः त्यांच्या बाजूने ठाम उभा राहणार आहे. जे बोलतो ते करून दाखवतो. आपला गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आत्ता प्रगतीपथावर जाऊ पाहतोय त्यामुळे पुढची पिढी खूप तरबेज आणि बुद्धिमानच उपजेल त्याची चिंता ज्यांनी कित्येकांना देशोधडीला लावलेत त्यांनी  तरी निदान करू नये असे मला तूर्तास वाटते आहे. आणि हो, कंत्राट मिळवून कोण कुठे गब्बर झालेत हे शेकापने तरी आत्ता लोकांना सांगू नये असे माझे तरी वैयक्तिक मत आहे. शिवाय कशाचा नारळ कोण फोडणार आहे याची तयारी आत्तापासूनच कशाला ते तर येणारी वेळच ठरवेल. नाही का?
    राजाभाई केणी
शिवसेना जिल्हा प्रमुख