या उपक्रमाचे नेतृत्व ॲड. मानसी म्हात्रे


अलिबाग (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या स्वागतापूर्वी शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प शहर महिला आघाडीने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. आज महिला आघाडीच्या वतीने अलिबाग भाजी मार्केट, मच्छी मार्केट, फळ मार्केट तसेच संपूर्ण एस.टी. स्टँड परिसराची मोठ्या उत्साहात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या उपक्रमाचे नेतृत्व ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले. त्यांनी सांगितले की, “गणपतीबाप्पाच्या आगमनापूर्वी आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ आणि सुंदर अलिबाग घडवणे हेच आपलं स्वप्न आहे आणि त्यासाठी अशा उपक्रमांद्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे.”

या मोहिमेत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नागरिकांनाही परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरातील बाजारपेठ व एस.टी. स्टँड परिसरात स्वच्छतेचा नवा संदेश पोहोचला.