विनापरवाना उत्खनन करून बांधकाम सुरू
महसूल प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी
प्रशांत थळे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील कोळगांव येथील भाटिया नामक उद्योगपतीने गट कमांक ४४४/१/२ एकूण क्षेत्र १-००-२३ हे. आर चौ.मी एवढया क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे सी. आर. झेड चे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात उत्खनन करून बांधकाम सुरू करण्यात आले आहे. अनधिकृतपणे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम सुरू असताना जागा मालक प्रशासन आपल्या खिशात असल्याचा आव आणून बिनधोकपणे बांधकाम करीत आहे . कायद्याचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी प्रशांत थळे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे .
सी. आर. झेड क्षेत्रात मातीचा भराव, उत्खनन किंवा इतर कोणतेही बांधकाम परवानगी नाही. असे असताना अलिबाग तालुक्यातील कोळगांव येथील क्षेत्रामध्ये राजरोसपणे उत्खनन मातीचा भराव व बांधकाम करण्यात येत आहे. सी. आर. झेड बाधीत क्षेत्रामध्ये अनाधिक पणे चालु असलेल्या बांधकामाकडे प्रशासन जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. संबंधित महसूल यंत्रणेला वारंवार कळवूनदेखील कानाडोळा केला जात असल्याचा आरोप प्रशांत थळे यांनी निवेदनामध्ये केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सी. आर. झेड मधील बांधकामास पूर्णतः मज्जाव केला आहे. अलिबाग तालुक्यातील आवास, किहीम, सासवणे, कोळगांव व रहाटले येथील सी. आर. झेड मधील बांधकामे जमिनदोस्त करण्यांत आली असुन सुध्दा प्रशासनाच्या आशिर्वादाने म्हणजेच संबंधित महसुल अधिकऱ्यांच्या सहमतीनेच कोळगाव येथे बांधकाम चालु असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.