ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे आजी माजी शिक्षकांचा सन्मान


सोगाव (अब्दुल सोगावकर ):जागतिक शिक्षक दिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील आजी माजी शिक्षकांचा ५ सप्टेंबर रोजी ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे त्यांच्या घरोघरी जाऊन शुभेच्छा देऊन सन्मानित केले.
ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सात गावांमध्ये नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा आदी कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांनी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमाला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, राजिप शाळेचे व इतर महाविद्यालयाच्या आजी माजी अशा तब्बल ४५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरी येऊन शुभेच्छा देत आपला जाहीर सन्मान केला, आघाडीने आपला ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रथमच सन्मान केल्याबद्दल सर्वच शिक्षक अक्षरशः भारावून गेले होते, त्यांनी ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे आभार मानले. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.