“ओबीसी प्रवर्गावर अन्याय होऊ देणार नाही”


खालापूर(प्रतिनिधी): खोपोली शहर व खालापूर तालुका ओबीसी समाजाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबत शासनाने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरला तीव्र हरकत नोंदविण्यात आली. याबाबत १७ सप्टेंबर रोजी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.

या वेळी ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर,संतोष जंगम मा. नगरसेवक राजेंद्र फक्के, जेष्ठ पत्रकार समता सैनिक दिनकर भुजबळ, मा.नगरसेवक श्रीकांत पुरी, अरुण पुरी, उद्योजक मोहन केदार, युवा नेते महेश काजळे,लढाऊ नेत्या सुरेखा खेडकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील ,मिलिंद पाटील,कामगार नेते रामचंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते हेमंत नांदे,नितीन चौधरी,सचिन मते,आशिष आंग्रे, अमोल शहाणे, निखिल गुरव, सचिन मसूरकर, विनायक तेलवणे, रावसाहेब कसबे, सुरेश पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, “ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती असून त्यांनाच पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल. सगे-सोयरे हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास हा निकष आहे. त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही. शासनाने काढलेला जीआर तातडीने रद्द करावा.”

यावेळी ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची ठाम मागणीही करण्यात आली.