अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीतील शाळेच्या व्यवस्थापनावरून सुरू असलेल्या वादाला शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी महत्वाचे निर्देश देत दिलासा दिला आहे. शाळेचे व्यवस्थापन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत शाळा डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे आणि आरसीएफ कंपनी यांनी पूर्वीच्या कराराप्रमाणेच सुरू ठेवावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन, भत्ते आणि इतर खर्च देखील याच दोन संस्थांनी कराराप्रमाणेच उचलावेत, तसेच याबाबतचे हमीपत्र तातडीने दाखल करावे असेही निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील १,१०० विद्यार्थी व ८० शिक्षक-कर्मचारी यांच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना सोसायटीला देण्यात आली आहे.
या शाळेचे व्यवस्थापन १९८१ पासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे असून, आरसीएफ प्रशासनासोबतच्या कराराच्या आधारे शाळा नियमित सुरू होती. मात्र २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी कराराचे नूतनीकरण करण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटीने नकार दिल्याने अडचण निर्माण झाली. न्यायालयाने याप्रकरणी, नवे व्यवस्थापन येईपर्यंत शाळा सोसायटीनेच सुरू ठेवावी, असे आदेश दिले होते.
दरम्यान, आरसीएफ प्रशासनाने नवीन व्यवस्थापनासाठी नवी दिल्लीतील डिएव्ही कॉलेज मॅनेजिंग कमिटी या संस्थेची निवड केली असली तरी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला असून पालकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती.
आता संचालकांच्या आदेशामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे हक्क तात्पुरते सुरक्षित झाले आहेत. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत शाळा व्यवस्थापनावरील अनिश्चितता कायम राहणार आहे.









