“अलिबागमध्ये दुचाकी भाड्याने मिळणार; पर्यटनाला नवी चालना”


अलिबाग (प्रतिनिधी) : गोवा आणि केरळच्या धर्तीवर आता अलिबागमध्येही पर्यटकांना बाईक आणि स्कूटर भाड्याने मिळणार आहेत. परिवहन विभागाने यासाठी दोन ऑपरेटरना अधिकृत परवाने वितरित केले असून पर्यटकांना आता नोंदणीकृत ऑपरेटरकडून तासाभरासाठी किंवा दिवसासाठी दुचाकी भाड्याने घेता येणार आहे.

या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांसाठी रोजगाराचं नवं साधन उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्यटकांना अ‍ॅक्टिव्हा, हिरो स्प्लेंडर, रॉयल एनफिल्ड यांसारख्या बाईक स्वस्त आणि सोयीस्कर दरात मिळतील. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी ही सेवा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. मात्र बाईक भाड्याने घेताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधारकार्ड दाखवणे बंधनकारक असेल.

आतापर्यंत अलिबागमध्ये अनधिकृतरीत्या दुचाकी भाड्याने मिळत होत्या. मात्र आता फक्त परवानाधारकांकडूनच बाईक मिळणार आहेत. यामुळे टॅक्सी व रिक्षावाल्यांच्या मनमानी भाड्याला आळा बसेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. त्याचबरोबर पर्यटकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, हुल्लडबाजी अथवा बीचवर स्टंटबाजी करू नये, ओव्हर स्पीडिंग टाळावे, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.