रायगड(प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील टेंभरे-आंबीवली येथून चोरीस गेलेल्या तब्बल साडे ११ लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्ष्यांची सुखरूप सुटका करत कर्जत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. चेन्नई, तामिळनाडूत छापा टाकून पोलिसांनी हे पक्षी हस्तगत केले असून, या प्रकरणी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.
१७ जुलै रोजी दाखल गुन्ह्यानुसार आरोपींनी ७ आफ्रिकन ग्रे पॅरट, १ ब्ल्यू-गोल्ड मकाव आणि १ स्कार्लेट मकाव असे एकूण ९ दुर्मिळ पक्षी चोरून नेले होते. या पक्ष्यांची किंमत ७५ हजारांपासून ते ४ लाख रुपयांपर्यंत असून त्यांची एकूण किंमत सुमारे ११ लाख २५ हजार इतकी आहे. हे पक्षी केवळ पैशानेच नव्हे तर त्यांच्या दुर्मिळ जाती, दीर्घायुष्य व संवादक्षम स्वभावामुळे विशेष मानले जातात.
आरोपी अनिल रामचंद्र जाधव (१९, रा. वावंढळ-खालापूर) आणि राजेशसिंग माही उर्फ समशेरसिंग (४३, रा. दिल्ली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय अधिकारी राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, अशा मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या व्यावसायिक फायद्यासाठी वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मौल्यवान वस्तू किंवा पक्षी पाळण्याचा छंद जोपासताना सुरक्षा उपाययोजना, सीसीटीव्ही आणि आवश्यक ती खबरदारी नक्की घ्यावी.









