अलिबाग (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. सर्वांनी हा सण उत्साही वातावरणात साजरा करताना कुठंही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी तसेच सतर्कता बाळगावी असंही आँचल दलाल यांनी म्हटलं आहे.
अलिकडच्या काळात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांच्या मंडपात देवीची प्रतिष्ठापना केली जाते यात्रांच्या आयोजनासोबतच जत्रा, भजन, कीर्तन, गरबा, दांडिया यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. देवीच्या दर्शनाबरोबरच या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. विशेषतः महिला आणि लहान मुलं यांची संख्या मोठी असते. अशा वेळी नागरिकांनी सुरक्षिततेची जाणीव ठेवून सहभाग घ्यावा, असे आवाहन दलाल यांनी केले.
त्यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाकडून घटस्थापना ते विसर्जनापर्यंत काटेकोर सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून, महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी महत्त्वाच्या चौकात वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत.
नागरिकांनी सणाच्या उत्साहात ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळावेत, धोकादायक फटाके टाळावेत, तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक साधनांची व्यवस्था ठेवावी, मंडप परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
“नवरात्रोत्सव हा समाजातील ऐक्य, परस्पर सन्मान आणि भक्ती वाढवणारा सण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारपणे सण साजरा करून आदर्श घालून द्यावा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.
त्याचबरोबर कोणतीही अनुचित घटना किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. यामुळे सुरक्षित, शांततामय आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवरात्रोत्सव साजरा करता येईल.









