रायगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने रायगड जिल्ह्यातील ज्या गावांना अद्याप स्मशानभूमी उपलब्ध नाही, अशा गावांचे सर्वेक्षण करून त्याची सविस्तर माहिती अहवालाच्या स्वरूपात तयार केली आहे. या अहवालाच्या आधारे गावागावांत स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
स्मशानभूमी ही गावासाठी अत्यावश्यक सुविधा असून अनेक ठिकाणी ती उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून संबंधित गावे ओळखून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. स्मशानभूमी बांधकामासाठी निधीची गरज असल्याने आमदार निधीतून मदत मिळावी यासाठी सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे.
यासोबतच जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, या उपक्रमाला गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे यांनी सांगितले की, “गावागावांत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे जिल्हा परिषदेचे प्राधान्य आहे. स्मशानभूमी हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा घटक असून यासाठी आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करत आहोत.”
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा, रस्ते, वीज यांसारख्या सुविधा पुरवल्यानंतर आता स्मशानभूमी उभारणीसाठी ठोस पावले उचलली जात आहेत. सर्वेक्षणामुळे नेमक्या किती गावांना ही सुविधा उपलब्ध नाही याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार असून सामाजिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.









