अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील समाजमंदिर येथे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या सदस्यांसह परिसरातील तरुणांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तालुक्यातील गोंधळपाडा येथील जयभवानी मित्र मंडळातर्फे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी (23 सप्टेंबर) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात सुमारे पंचवीसहून अधिक तरुणांनी रक्तदान केले. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. दीपक गोसावी, समाजसेवक अधीक्षक नवनाथ अळ्ळी, अधिपरिचारक रामकुमार निकस, वैभव कांबळे, गणेश भोये, चालक महेश घाडगे, मंगेश पिंगळा यांच्या पथकाने रक्त संकलन केले. रक्तदात्यांना यावेळी जिल्हा रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. तर जयभवानी मंडळातर्फे रक्तदात्यांना नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. मंडळाचे अध्यक्ष मनोज पडियार यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सुमित चव्हाण, महेश पडियार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.









