रायगड (प्रतिनिधी): रायगड किल्ला रोपवेवर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य कसे करावे याचा सराव करण्यासाठी गुरुवारी सकाळी थरारक मॉक ड्रिल पार पडला. दोरीच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या बचाव सरावात विविध यंत्रणांचा संयुक्त सहभाग होता. सरावाद्वारे बचाव कार्यातील समन्वय आणि कार्यक्षमतेची तपासणी करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी एनडीआरएफ ०५ बटालियन पुणेचे सहाय्यक कमांडंट निखिल मुद्होळकर, निरीक्षक अंकित कुमार, नितीन सोकाशी, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, नायब तहसीलदार आर. निकम, रायगड रोपवे प्राधिकरणाचे एस. भालेराव तसेच रायगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल र. देशमुख उपस्थित होते.
सहभागी पथके
या सरावात एकूण ९३ जवान व कर्मचारी सहभागी झाले.
एनडीआरएफ पथक : २७
अग्निशमन दल : १५
रायगड रेस्क्यू टीम : ३०
रायगड पोलीस : १०
आरोग्य विभाग : ०६
तसेच २ रुग्णवाहिका व १ अग्निशमन वाहन तैनात करण्यात आले होते.
सरावाचे उद्दिष्ट
रोपवेवर अडकलेल्या प्रवाशांचे तातडीने रेस्क्यू करणे, जखमींना सुरक्षितपणे आरोग्य विभागाकडे पोहोचवणे तसेच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि प्रशासन यांच्यातील समन्वय तपासणे हा या मॉक ड्रिलचा प्रमुख उद्देश होता. या सरावामुळे प्रत्यक्ष दुर्घटना घडल्यास सर्व यंत्रणा तत्परतेने आणि समन्वयाने काम करण्यास सज्ज असल्याचे अधोरेखित झाले.









