भाजप नेते सवाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर


अलिबाग (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सवाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तगट तपासणी तसेच अनेक लोकांनी रक्तदान केले. आदी चाचण्या करण्यात आल्या. तसेच महिलांसाठी विशेष तपासणी, मुलांसाठी आरोग्य सल्ला आणि वृद्ध नागरिकांसाठी फिजिओथेरपी व औषधोपचार याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण भागातील लोकांना सहज उपलब्ध न होणाऱ्या विविध वैद्यकीय सेवा या शिबिरातून विनामूल्य देण्यात आल्या.

शिबिरात अनुभवी डॉक्टर्सनी नागरिकांना तपासणीसोबत आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि नशामुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत योग्य आरोग्य सल्ला दिला. ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.

सवाई पाटील यांनी या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असून, “आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करणे हाच खरा सन्मान आहे,” असे त्यांनी सांगितले. भविष्यातही अशा शिबिरांचे नियमित आयोजन करून लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमात विशेष उपस्थितीत भाजप नेते माजी आमदार पंडितशेठ पाटील, भाजप नेते आस्वाद पाटील, जिल्हाध्यक्ष चित्राताई पाटील, सरचिटणीस अँड महेश मोहीते,भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

ग्रामीण जनतेसाठी आरोग्य तपासणी शिबिर हा खऱ्या अर्थाने “सामाजिक उत्सव” ठरल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.

या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हाचे सुप्रसिद्ध नटसम्राट प्रतिम सुतार यांने केले.