रायगड (प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील पोटलवाडी (पो. गौळवाडी) येथे १ ऑक्टोबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास एक थरारक घटना घडली. जमिनीच्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले आणि संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे सावट पसरले आहे. सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल मालदार हे आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत मुफीज गुलाम मालदार याच्याशी जमिनीच्या वादावर चर्चा करत होते. अचानक, मुफीजसोबत आलेल्या ४ अनोळखी तरुणांपैकी एकाने खिशातून देशी पिस्तूल काढले आणि थेट इस्माईल यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळी थोडक्यात चुकली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. गोळीबारानंतर अनिस अकबर मालदार हा कोयता उगारत इस्माईल यांच्यावर धावून गेला, त्यांना शिवीगाळ करत “तुझा जीव घेईन” अशी धमकी दिली. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रात्रीच्या शांततेत हा थरार पाहणाऱ्याऱ्यांच्या काळजात धडकी भरली. अशातच आरोपी आणि त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले.
या घटनेनंतर कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ३ आरोपींना अटक केली, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. गावाच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीती पसरली आहे. अशा गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.









