कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलन शिक्षक बदल्यांच्या मागणीसाठी दालनाबाहेर झोपून ठिय्या


रायगड (प्रतिनिधी): कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या मागणीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्रीवर्धन तालुक्यातून कर्जत तालुक्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या अचानक थांबवण्यात आल्याने हे आंदोलन उभे राहिले आहे.

या बदल्या थांबल्यामुळे कर्जत तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने बदल्या करण्याची मागणी सुरेश लाड यांनी केली आहे.

लाड यांनी आरोप केला आहे की, या बदल्या मंत्री आदिती तटकरे यांच्या तोंडी आदेशावरून थांबवण्यात आल्या आहेत. प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया पूर्ण असूनही राजकीय हस्तक्षेपामुळे बदल्या रोखल्या गेल्याचा त्यांचा दावा आहे.

“जोपर्यंत शिक्षक बदल्यांचे आदेश काढले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असा ठाम इशारा देत लाड यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक पातळीवर समर्थन मिळत असून, आदिवासी भागातील पालक आणि विद्यार्थी यांनाही यावरून मोठ्या अपेक्षा आहेत.

******

हे प्रकरण निकाली न लागल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही माजी आमदारांनी दिला आहे.