अलिबागमध्ये अटकेत असलेल्या भूषण पतंगेचा उपचारादरम्यान मृत्यू


अलिबाग (प्रतिनिधी) : दरोडा प्रकरणात अटकेत असलेला भूषण पतंगे (वय ३५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पतंगे याला चौकशीदरम्यान तब्येत बिघडल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती आणखी गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

भूषण पतंगे याला याअधी २०१९ मध्ये श्रीवर्धन येथील दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या वेळी वैद्यकीय तपासणीत त्याला फीट (अपस्मार)चा आजार असल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या आजाराची पार्श्वभूमी आधीपासूनच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सध्या या प्रकरणी आवश्यक पंचनामा व मृत्यूची नोंद प्रक्रिया सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी दिली.