रायगड (प्रतिनिधी): दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे दिशेच्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळपासूनच अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्सिटपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून, प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
शनिवार–रविवारची सुटी आणि दीपावलीचा उत्साह यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी, पर्यटक आणि नागरिकांनी आपल्या गावी किंवा पर्यटनस्थळी जाण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. काल दिवसभर झालेल्या कोंडीनंतरही आज परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.
वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतूक हळूहळू पुढे सरकत असून, महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. चालकांना सावधपणे वाहन चालवण्याचे तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सततची ही कोंडी वाहनचालक आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असून, एक्सप्रेसवेवरील सणासुदीतील प्रवास अधिकच कष्टदायक झाला आहे.









