नारायण नाईक प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण
अलिबाग (प्रतिनिधी): खाजगी कंपन्या सरकारशी साटे लोटे करून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच वनजमिनीवर डोळा ठेवत आहेत. रोजगाराचे गाजर दाखवून तसेच विकासाच्या अतिरंजीत कल्पना जनतेसमोर ठेवून तुम्ही नेमका कोणता विकास साधत आहात, याचा जाब शेतकरयांनी पुढे येऊन सरकारला विचारण्याची गरज आहे असे परखड मत सर्वाहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी व्यक्त केले.
अलिबाग तालुक्यातील चौल येथील नारायण नाईक प्रतिष्ठानच्या वतीने वयाची 75 वर्षे पुर्ण करणारे ज्येष्ठ नागरीक यांच सन्मान तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारया व्यक्तींचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. उल्का महाजन यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, आदिवासींसाठीच्या लढयाचे अनुभव कथन केले. ज्येष्ठांचा सन्मान करण्याच्या नाईक प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. 
पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे शैलेश राईलकर यांना समाज कार्य गौरव पुरस्कार, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्त व कचरा मुक्त गाव या करीता कार्यरत असलेले राकेश काठे यांना राजाभाऊ राईलकर पर्यावरण स्नेही पुरस्कार, पत्रकार प्रफुल्ल पवार यांना लोकहितकारी पत्रकारीता पुरस्कार , आदेश नाईक व योगिता नाईक या दाम्पत्याला कृषि मित्र पुरस्कार तसेच सागर थळे यांचा सांस्कृतिक कार्य गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. चौल ग्रामपंचायत माजी सरपंच तसेच अलिबाग पंचायत समिती माजी सदस्य विश्वनाथ (भाई) मळेकर गौरवण्यात आले. गावातील अमृत महोत्सवी वयोमान असलेल्या 48 नागरिकांचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य व्दारकानाथ नाईक नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौलचे माजी सरपंच प्रवीण राऊत, चौल ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित गुरव, ग्रामपंचायत सदस्य अतुल वर्तक, माजी सरपंच मधुकर फुंडे, जेष्ठ नागरिक संघ चौल अध्यक्ष रमेश नाईक, माजी अध्यक्ष रमेश म्हात्रे, रेवदंडा जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नारायण नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर नाईक यांनी प्रास्ताविक केले. स्वागत विश्वस्त नंदकुमार नाईक, मंगेश नाईक, ललिता म्हात्रे, राजश्री नाईक, भक्ती रानवडे यांनी केले. आभार प्रदर्शन महेंद्र नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन सागर थळे यांनी केले.या कार्यक्रमास संयोजन समिती सदस्य मदन ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे, सुधाकर राऊळ, हर्षदा म्हात्रे, जयवंत कंटक तसेच उत्कर्ष महिला मंडळ, युवक मंडळ यांनी सहकार्य केले.









