नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच उड्डाणं सुरू; एअर इंडिया एक्सप्रेससह इंडिगो आणि अक्सा एअर तयार!


नवी मुंबई (खास प्रतिनिधी): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, उद्घाटनाच्या तारखेसंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसने नवी मुंबई विमानतळावरून दररोज पाच मेट्रो शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १५ हून अधिक शहरांसाठी दररोज २० फ्लाइट्स ऑपरेट केल्या जातील.

२०२६ पर्यंत एअर इंडिया एक्सप्रेसची सेवा वाढवून ५५ फ्लाइट्स करण्याचा कंपनीचा मानस आहे, ज्यामध्ये ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल.

दरम्यान, इतर विमान कंपन्याही नवी मुंबई विमानतळावरून सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. इंडिगो एअरलाईन्सने या विमानतळावरून ३६ देशांतर्गत मार्गांवर उड्डाणांची योजना आखली आहे. पुढील टप्प्यात इंडिगो दररोज १५८ विमानसेवा देणार असून त्यापैकी १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणं असतील.

अक्सा एअरदेखील नवी मुंबईतून दररोज ४० फ्लाइट्स चालवणार आहे, ज्यापैकी ८ ते १० फ्लाइट्स आंतरराष्ट्रीय असतील.

विमानतळ सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तथापि, विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक व प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे. अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पहिल्या उड्डाणापूर्वी नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य मुद्दे:

NMIA लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार

एअर इंडिया एक्सप्रेसकडून ५ मेट्रो शहरांसाठी दररोज उड्डाणं

पहिल्या टप्प्यात २० फ्लाइट्स, २०२६ पर्यंत ५५ पर्यंत वाढ

इंडिगो व अक्सा एअरकडूनही मोठ्या प्रमाणात विमानसेवा

नामकरणाबाबत स्थानिकांमध्ये असंतोष कायम