अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग रोहा मार्गावरील फुल तुटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्थानिकांकडून या दुर्घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही बांधकाम विभागाने पुढच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचं स्थानिकांचा म्हणणं आहे.
हॅम योजनेअंतर्गत अलिबाग–रोहा मार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराला आत्तापर्यंत 104 कोटी रुपये देण्यात आले असून 14 कोटी देणे शिल्लक आहे. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने ठेकेदाराने पुढील काम थांबवले आहे.
पावसाळ्या या या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात होती मात्र बांधकाम विभागाकडून या मागणीची दखल घेतली नाही. खानाव ते वाढव दरम्यानच्या पुलाच्या दुरुस्तीकडेही यंत्रणांनी लक्ष दिले नाही त्यामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या दयनीय स्थितीकडे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सोमवारी सायंकाळी वढाव–खानाव मार्गावरील साकव मधोमध तुटल्याने दुचाकीवरून प्रवास करणारी महिला अपघातग्रस्त झाली. जखमी महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता दुरुस्ती व साकवाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.









