वकिलांचा लाल फिती लावून निषेध — जिल्हा न्यायालय अलिबागात आंदोलन


अलिबाग (प्रतिनिधी): आज जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे वकिलांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाल फिती लावून शांततेत निषेध नोंदवला. बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या आवाहनानुसार हा निषेध आयोजित करण्यात आला होता.

या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांतील वकिलांनी सहभाग नोंदवला. वकिलांनी नियमित न्यायालयीन कामकाज पार पाडत असतानाच लाल फिती लावून शासनाने अ‍ॅडव्होकेट्स प्रोटेक्शन अ‍ॅक्ट तातडीने मंजूर करण्यात यावा या मुख्य मागणी साठी व शेवगाव येथील वकिलांवर झालेल्या प्रणघातक हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, “आम्ही आज लाल फिती लावून शांततेत निषेध नोंदवला आहे. आमच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.

या निषेधामुळे न्यायालयीन कामकाज मात्र सुरळीत सुरू राहिले. तथापि, वकिलांच्या लाल फिती लावून केलेल्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली असून शासनाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी सर्वसामान्यांचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रसंगी बार असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री. अनंत पाटील, सचिव श्री अमित देशमुख, खजिनदार श्री. राजेंद्र माळी, सदस्य अजहर घट्टे, जेष्ठ वकील तसेच नवोदित वकील हजर होत्या.