अलिबाग (प्रतिनिधी): त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अलिबाग शहरातील रामनाथ परिसरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात बुधवारी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण मंदिर आणि परिसर हजारो पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. मंदिराच्या सभोवताल तसेच प्रवेशद्वारापासून पुष्करणीपर्यंत रांगोळ्या, तोरणे आणि फुलांच्या सजावटीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरासमोरील पुष्करणीत दिव्यांचे पडणारे प्रतिबिंब अत्यंत देखणे आणि मनमोहक भासत होते.
संध्याकाळी आरतीनंतर दीपप्रज्वलनाचा शुभारंभ झाला. त्यानंतर रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून गेले. श्रीरामाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. या नयनरम्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी अलिबाग तसेच परिसरातील नागरिक, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी हा सोहळा छायाचित्रे आणि व्हिडिओद्वारे टिपून ठेवला.
या उत्सवामुळे रामनाथ परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं श्रीराम मंदिर आणि त्याच्या सभोवतालचा परिसर पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने साजरा झालेला हा दीपोत्सव अलिबागकरांसाठी अविस्मरणीय ठरला.









