अलिबाग/मुरुड (ओमकार नागावकर) : श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडवणारी कोर्लई ते श्री एकविरा देवी पदयात्रा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडली. साई सेवक एकविरा मंडळ तर्फे दरवर्षीप्रमाणे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कोर्लई येथून शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) पालखी मिरवणुकीसह या यात्रेचा शुभारंभ झाला.
भक्तिगीतांच्या गजरात, साई नामस्मरणात आणि दिंडीच्या तालात निघालेल्या या पदयात्रेत महिला मंडळी, तरुणाई आणि सर्व समाजघटकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. साऱ्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, १२ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र श्री एकविरा देवीचे दर्शन होणार आहे. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, तसेच मा. जिल्हा परिषद सदस्या राजेश्री मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जाभरित स्वरूप प्राप्त झाले.
साई सेवक एकविरा मंडळाचे संस्थापक गजानन पद्माकर पाटील (सायन कोळीवाडा विधानसभा संघटक व मुरुड तालुका संपर्क प्रमुख), अध्यक्ष अभय जयकृष्ण पाटील, उपाध्यक्ष मारुती लक्ष्मण पाटील, खजिनदार जितेंद्र नारायण पाटील आणि सहखजिनदार राजू पुरुषोत्तम आगरावकर यांनी या भक्तिमय यात्रेचे उत्तम नियोजन केले असून, सर्व भाविकांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही पदयात्रा केवळ धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहे — अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.









