अलिबाग (प्रतिनिधी): “आता थांबायचे नाय…” या निर्धारासह अलिबाग शहरातील भूमिगत गटार प्रकल्पाच्या कामांना नव्याने गती मिळाली आहे. काही दिवसांपासून मंदावलेले काम पुन्हा सुरु झाले असून, प्रकल्पाची प्रगती प्रत्यक्ष तपासण्यासाठी माजी नगराध्यक्ष श्री. प्रशांत मधुसूदन नाईक यांनी स्थळ पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली तसेच विलंब होऊ नये यासाठी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यासाठी भूमिगत गटार प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना तोडगा देण्यासाठी हे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कामाच्या प्रगतीबाबत समाधानी असल्याचे सांगत, पुढील काही दिवसांत प्रकल्प अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनीही काम सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.









