नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईच्या सानपाडा येथील १९ वर्षीय पलाश प्रखर हा तरुण अलिबागमधून महिन्याभरापूर्वी बेपत्ता झाला असून संपूर्ण महिना उलटून गेला तरी त्याचा शोध लागला नसल्याने त्याचे आई–वडील चिंतेत आहेत. १ नोव्हेंबरला अलिबागच्या समुद्रात आपल्या मित्राला वाचवण्यासाठी जीवाची परवा न करता उडी मारणारा पलाश आज कुठे आहे, जिवंत आहे का ? या प्रश्नांच्या गलक्यात कुटुंब आहे. पण नक्की परत येईल, अशी अशाही त्यांना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी पलाश आपल्या ३ मित्रांसोबत अलिबागला फिरायला गेला होता. गुगल मॅप्सपाहून ते अलिबाग कोर्टाजवळील समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. पलाश किनाऱ्याजवळ उभा असताना त्याचा मित्र शशांक सिंग समुद्रात भरतीच्या पाण्यात अडकला. मदतीसाठी ओरडणाऱ्या मित्राला पाहताच पलाशने पाण्यात उडी मारली. मात्र शशांकचा जीव वाचवता आला नाही; त्याचा देह ३ नोव्हेंबरला सापडला. मात्र पलाशचा कुठलाही ठावठिकाणा आजवर लागलेला नाही.
५ नोव्हेंबरला अलिबाग पोलिसांनी मिसिंग रिपोर्ट नोंदवला आणि त्यानंतर पोलिस, किनारी सुरक्षा पथके, NDRF, स्थानिक स्वयंसेवक यांनी ड्रोन, स्पीडबोट यांमधून शोधमोहीम सुरू ठेवली. परंतु ठोस धागा मिळाला नाही. दरम्यान, पलाशचे आई–वडील जवळपास रोज अलिबागला जात आहेत, अधिकाऱ्यांशी बोलत आहेत, प्रत्येक शक्य त्या दिशेने तपास करत आहेत. त्यांनी आता सोशल मीडियावर मोठी मोहीम उभी केली आहे. मुलाचे फोटो, माहिती, संपर्क क्रमांक सर्वत्र शेअर करून कोणालाही काही माहिती मिळाल्यास पुढे येण्याचे आवाहन ते करत आहेत. ‘आम्ही हार मानणार नाही. कोणीतरी त्याला पाहिले असेल. आम्हाला फक्त आमचा मुलगा परत हवा आहे,’ अशी हळवी विनंती त्याचे वडील, मुनीन्द्र नारायण प्रेम करत आहेत.









