रायगड (प्रतिनिधी): आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने स्ट्राँग रूमची अंतिम यादी जाहीर केली आहे. प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रासाठी मतदानोत्तर EVM मशिन्स ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि उच्च सुरक्षा असलेली ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकांदरम्यान आणि मतमोजणीपर्यंत या स्ट्राँग रूममध्ये कडक बंदोबस्त, CCTV देखरेख आणि तीन स्तरांचा सुरक्षा व्यवस्था असेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
खोपोली नगरपरिषदेचे स्ट्राँग रूम सेंट मेरीज हायस्कूल, चिंचवली डीपी रोड येथे तर अलिबाग नगरपरिषदेचे स्ट्राँग रूम केईएस जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल, अलिबाग येथे निश्चित करण्यात आले आहे. पेनसाठी कोकण एज्युकेशन सोसायटी- लिटल एंजल्स स्कूल, पेन, उरणसाठी उरण नगर परिषद कार्यालय, मुरुडसाठी तहसील कार्यालय, मुरुड, तर रोह्यासाठी जेठो नागरिक सभामंडप, रोहा येथे स्ट्राँग रूम असणार आहे.
करजत नगरपरिषदेची मतदान यंत्रणा करजत नगर परिषद कार्यालयात, माशेगावची उप कोषागार कार्यालय, माशेगाव येथे तर श्रीवर्धनसाठीची स्ट्राँग रूम तहसील कार्यालय, श्रीवर्धन येथे निश्चित करण्यात आली आहे. महाड नगरपरिषदेची यंत्रणा महाड नगर परिषद कार्यालयात सुरक्षित ठेवली जाईल.
जिल्हा प्रशासनाने सर्व स्ट्राँग रूम ठिकाणी नियमांनुसार सर्व सुविधा आणि आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.









