रायगड (प्रतिनिधी) : रायगडातील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीनंतर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. “सुनील तटकरे हे रायगडला लागलेला कलंक आहे. जिल्ह्यात जिथे राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढत आहे, तिथे का सतत भांडणाची परिस्थिती निर्माण होते?” असा जळजळीत सवाल विकास गोगावले यांनी उपस्थित केला.
महाडमध्ये झालेल्या जोरदार राड्यानंतर विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वाद आणखी चिघळले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार आरोप होत आहेत. स्थानिक पातळीवरही समर्थकांत तणावाची भावना दिसून येत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकांना, सवाल जवाबांना आणि रणनीती आखणीला उधाण आले आहे. या घडामोडींचा जिल्ह्यातील राजकारणावर परिणाम होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









