अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग–रोहा एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांना निवेदन वजा नोटीस देण्यात आली. धोकादायक पुलामुळे बंद झालेली ही सेवा सुरू नसल्याने प्रवासी, महिला, नागरिक तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्गाची तात्काळ निर्मिती करून एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील ८ दिवसांत आवश्यक उपाययोजना करून सेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
या वेळी संतोष निगडे, पृथ्वीराज पाटील, ॲड. कौस्तुभ पुनकर, ॲड. अविनाश भगत, ॲड. महेश शिंदे, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









