मेढेखार बाधन पट्टीतील रखडलेल्या रस्त्याच्या कामाची राजाभाई केणी यांच्याकडून पाहणी.


अलिबाग (प्रतिनिधी):अलिबाग तालुक्यतील मेठेखार बाधन पट्टी येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी केली. या भेटीदरम्यान स्थानिक ग्रामस्थ, कार्यकर्ते तसेच पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी रस्त्याच्या खराब स्थितीमुळे होणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती राजाभाई केणी यांना दिली. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होऊन वाहतूक ठप्प होते, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी निर्माण होतात, तसेच रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचण्यात मोठा त्रास सहन करावा लागतो, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली.

या समस्या गंभीरतेने घेत राजाभाई केणी यांनी संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून रखडलेले काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देणार असल्याचे सांगितले. स्थानिक विकासकामे वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक असून, हा रस्ता प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात कार्यकर्त्यांनीही ग्रामस्थांना साथ देत रस्त्याच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मेढेखार बाधन पट्टीतील नागरिकांनी या भेटीचे स्वागत करत लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.