अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यात बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील विविध भागांत बिबट्याचे दर्शन होत असताना आता अलिबागमध्येही ही चिंता वाढली आहे. नागाव परिसरात आज सकाळी बिबट्या थेट मानवी वस्तीत शिरल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी धावपळ उडाली. भरवस्तीत दिसलेल्या या बिबट्याने दोन जणांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या एका वाडीत आश्रय घेऊन बसल्याचे निदर्शनास आले असून त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनविभागाचे पथक प्रयत्नशील आहे. परिसरात शोधमोहीम राबवून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, घराबाहेर विनाकारण फिरू नये आणि वनविभागाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तसेच, अनावश्यक गर्दी न करता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्याच्या उपस्थितीमुळे परिसरात तणाव असला तरी वनविभाग आणि पोलिसांचे पथक बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याने परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









