अंबादास दानवे यांच्या ‘कॅशबॉम्ब’चा राज्यात मोठा गदारोळ; रायगडात शिवसैनिकांचा तीव्र निषेध


अलिबाग (प्रतिनिधी): नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या कथित ‘कॅशबॉम्ब’मुळे रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांच्या भावना तीव्र ढवळून निघाल्या आहेत. दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करत तीन व्हिडिओ प्रसिद्ध केले. त्यातील एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रोकड मोजताना दिसत असल्याने संपूर्ण राज्यात राजकीय खळबळ उडाली. मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचा आरोप शिवसेनेने करत दानवे यांनी जाणूनबुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

या घटनाक्रमानंतर रायगडमधील शिवसैनिकांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे. अलिबाग, रोहा आणि मुरुड येथे शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. अलिबागमध्ये जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन केले. शिवसैनिकांनी दानवे यांनी आमदार दळवी व शिवसेना पक्षाची बदनामी करण्यासाठी “सुपारी घेतली” असल्याचा गंभीर आरोप केला.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ फेरफार केलेला असून त्याचा दळवी यांच्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे मुद्दामच खोटा व्हिडिओ पसरवून जनमत दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. या प्रकरणी दानवे यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. नागपूर अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चांवर याचा परिणाम होत असून या ‘फेक व्हिडिओ’ प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही पुढे येत आहे. आगामी दिवसांत या वादाला कोणते वळण मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.