नागावच्या बिबट्यामुळे गावात भीतीसह संभ्रम; सुटकेचा निश्वास अद्यापही दूरच ?


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे गावात भीती आणि प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. दिवसाढवळ्या पाच जणांवर हल्ला करून बिबट्या पसार झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून, तो पुन्हा गावात येईल का याबद्दल लोक सतत दडपणाखाली आहेत. वनविभागाने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवूनही बिबट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. पिंजरे, टेहळणी, कॅमेरे, पथके असे सर्व उपाय असूनही शोधमोहीम अपयशी ठरल्याने वनविभागावर टीका वाढली आहे. बिबट्या नेमका कुठून आला आणि आता कुठे गेला हे न समजल्याने वातावरण असुरक्षित भासत आहे.

या घटनेचा थेट परिणाम अलिबाग-नागावमधील पर्यटन व स्थानिक व्यवसायांवर दिसून येत आहे. नाताळच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये गर्दी होणे स्वाभाविक आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे पर्यटकांमध्येही संभ्रम असल्याने हॉटेल, होमस्टे, दुकाने, परिवहन यांना मोठा फटका बसला आहे. शाळांना तात्पुरती सुट्टी, रात्री गस्त, तसेच नागरिकांनी सावधगिरी म्हणून घराबाहेर पडणेच टाळले आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले असले तरी कोणती स्पष्ट कार्ययोजना न दिल्याने नागरिकांची चिंता वाढतच आहे. बिबट्या पुन्हा दिसेपर्यंत किंवा पकडला जाईपर्यंत गावाला सुटकेचा निश्वास मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत डॉ. सचिन राऊळ यांनी आक्रमक धोरण अवलंबले असून चांगलाच संताप व्यक्त केला आहे.