नागावपाठोपाठ अक्षी-साखरीमध्ये दोघांवर हल्ला
आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी; भीतीचं सावट
संधी मिळूनही बिबट्या निसटल्यानंतर वन विभागावर गावकरी संतप्त
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागमध्ये दिनांक 9 डिसेंबर पासून नरभक्षी बिबट्याने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. नागाव मध्ये 5 ते 7 जणांना जखमी केल्यानंतर गायब झालेला बिबट्या थेट अलीबागच्या अक्षी साखरी गावात अवतरला आणि त्याने आज सकाळी दोघांवर हल्ला केला आहे. पहाटे 6 वाजता बिबट्या दबक्या पावलांनी आला. त्याने एक टपरीवजा हॉटेलमध्ये शिरून एका कर्मचाऱ्याला व प्रातःविधीसाठी गेलेल्या एकावर जबर हल्ला करून त्याला जखमी . हे दोघेही बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले असले तरी पंजा मारून बिबट्याने त्यांना जखमी केले आहे.
आतापर्यंत या बिबट्याने अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी आठ जणांना जखमी केले आहे. वन विभागाने सर्व शक्तिनिशी जंग जंग पछाडलं मात्र हा बिबट्या त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. तो जंगलात पळून गेला असावा अशी शक्यता काल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. मात्र हा बिबट्या पुन्हा मानवी वस्तीत येऊन नागरिकांना जखमी करत असल्याने गावामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेय.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेत. मात्र वन विभागावर गावकरी संताप व्यक्त करत आहेत. अनेक वेळा शोध मोहिमेदरम्यान संधी असतानाही बिबट्या हाती लागला नाही त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.









