हाशिवरे येथे ३१ वी पुरुष–महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे भव्य आयोजन


अलिबाग (प्रतिनिधी):आद्य नाईक प्रतिष्ठान अमितदादा नाईक मित्र मंडळ यांच्या वतीने, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने महात्मा गांधी क्रीडा मंडळ, हाशिवरे येथे ३१ वी पुरुष–महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२५–२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे रायगड जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची आणि जिल्हा संघात निवड होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण क्रीडा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी अलिबाग–मुरुडचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमितदादा नाईक यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन, आयोजन व व्यवस्थापन काटेकोरपणे करण्यात येत असून, खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील नामांकित पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून, अत्यंत चुरशीचे सामने रंगणार आहेत. निवड चाचणीद्वारे निवडले जाणारे खेळाडू पुढील राज्यस्तरीय व आंतरजिल्हा स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला व्यासपीठ मिळून खो-खो खेळाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.