अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करताना सुमारे 400–500 मीटर कांदळवनांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या पल्लवी पाटील यांनी केला आहे. ही घटना 15 नोव्हेंबर 2025 रोजी घडली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून एमआयडीसीने पर्यावरणाचा उघड विध्वंस केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहापूर औद्योगिक क्षेत्राला 2006 पासूनच स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, लोकांचे आक्षेप डावलून हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सर्वे नंबर 596/अ मध्ये झालेल्या कांदळवन कत्तलीबाबत तक्रार देण्यासाठी शेतकरी पोयनाड पोलीस ठाण्यात गेले असता लेखी तक्रार घेण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वनविभागाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात एमआयडीसी अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करणे, पर्यावरणीय हानीचा वैज्ञानिक अहवाल जाहीर करणे, तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे आणि कामांना तात्काळ स्थगिती देण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. न्याय न मिळाल्यास न्यायालयीन लढ्याचा इशाराही पल्लवी पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी कांदळवन तोडीबाबत कोणतीही तक्रार मिळाली नसून, केवळ तलावात कचरा व राख टाकल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले आहे.









