नवी दिल्ली(प्रतिनिधी): अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मा. ना. किरेन रिजीजू यांची आज रायगड जिल्ह्यातील राज्यसभा खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. धैर्यशीलदादा पाटील यांनी जिल्ह्याचे महामंत्री सतीश धारप यांच्यासह संसदेतील मंत्री दालनात भेट घेतली. या भेटीत रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या—मुस्लिम, जैन व बौद्ध—प्रलंबित विकासकामांना मंजुरी मिळावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी अलिबाग येथे ३ कोटी रुपयांचे मुस्लिम सामाजिक संकुल, अलिबाग, पेण, पनवेल व महाड येथे प्रत्येकी ३ कोटी रुपयांची जैन समाजासाठी सामाजिक संकुले, महाड तालुक्यात बौद्ध समाजासाठी १० कोटी रुपयांचे सामाजिक संकुल, पाली शहरात मुस्लिम समाजासाठी १ कोटी रुपयांचे शादीखाना तसेच श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत गावात मुस्लिम सामाजिक संकुल उभारणी आदी प्रमुख कामांचा समावेश होता. यासह जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी प्रस्तावित अन्य ४० विकासकामांनाही तत्त्वतः मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.
येत्या फेब्रुवारी महिन्यात वरील सर्व ५५ कामांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांची तरतूद होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण पाठपुराव्याबद्दल राज्यसभा खासदार मा. धैर्यशीलदादा पाटील यांच्या प्रयत्नांचे भाजप कार्यकर्त्यांकडून तसेच मुस्लिम, जैन व बौद्ध समाजबांधवांकडून विशेष कौतुक होत आहे.









