नवनियुक्त जिल्हा उपनिबंधक तन्वीर पाटील यांचे रायगड जिल्हात स्वागत


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा उपनिबंधक (DDR) श्री. तन्वीर पाटील यांनी आज अधिकृतपणे रायगड जिल्ह्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (RDCC) चे अध्यक्ष श्री. जयंत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुरेश खेरे, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने श्री. तन्वीर पाटील यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अलिबागचे मा. नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. मंदार वर्तक यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पाटील यांचा सन्मान केला.

यावेळी सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सहकारी संस्था अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासन व सहकार क्षेत्र यांच्यात समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. तन्वीर पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी, सामान्य नागरिक तसेच महिला व युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सहकारी योजनांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहकार चळवळीची भूमिका महत्त्वपूर्ण असून पुढील काळात प्रशासन व सहकारी बँका संयुक्तपणे विकासाभिमुख कार्य करतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.