महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती जाहीर


मुबंई (प्रतिनिधी): राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर आज अधिकृत घोषणा करण्यात आली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले असून त्यानंतर आता महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे बंधूंची ही युती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, मराठी मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत या घोषणेतून मिळत आहेत.