अलिबाग (प्रतिनिधी): नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे धाव घेतली आहे. परिणामी जिल्ह्यातील समुद्रकिनारे, थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान तसेच इतर पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.
डिसेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा आणि सलग सुट्ट्यांचा हंगाम यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. नाताळ आणि नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन तसेच माथेरान या प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळत आहे.

विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून किनारे गजबजून गेले आहेत. नाताळपासून ३१ डिसेंबरपर्यंत बहुतांश पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स पूर्णतः आरक्षित असल्याची माहिती येथील व्यावसायिकांनी दिली. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चांगलाच दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यातील विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवीगार नारळी-पोफळीची वनराई, ऐतिहासिक गडकिल्ले, लेणी तसेच निसर्गरम्य बागा यांचे पर्यटकांना नेहमीच विशेष आकर्षण राहिले आहे.
नाताळचा उत्साह आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा वाढता ओघ जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दिसून येत असून, नववर्षाच्या स्वागतासाठीही ही गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









