रायगड (प्रतिनिधी): मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात नाताळ सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पोर्तुगीज समाजाची वस्ती असलेल्या या ऐतिहासिक गावात घरोघरी येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी आपल्या घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती तसेच येशू जन्माचे सुंदर देखावे उभारले होते.

गावातील प्रसिद्ध माउंट कार्मेल चर्च विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. नाताळच्या पूर्वसंध्येला रात्री भाविकांनी मोठ्या संख्येने चर्चमध्ये उपस्थित राहून सामूहिक प्रार्थना केली. मध्यरात्री येशू ख्रिस्ताच्या जन्माचा पवित्र सोहळा भक्तिभावात पार पडला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
नाताळनिमित्त गावभर आनंद, उत्साह आणि शांततेचे वातावरण होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नाताळ सण आनंदाने साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कोर्लई गावातील नाताळ उत्सवाने धार्मिक एकोपा आणि सामाजिक सलोखा अधोरेखित केला.









