मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी….


खोपोली (प्रतिनिधी): मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुण्याच्या अमृतांजन ब्रिजपासून सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ख्रिसमस डे, शनिवार-रविवार आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी बाहेर पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.
नाताळचा सण साजरा करण्यासाठी अनेक पर्यटक लोणावळा व परिसरात दाखल झाल्याने जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरही वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली आहे.
वाहतूक कोंडीची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस प्रशासनाने वाहनचालकांना संयम बाळगण्याचे व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची सद्यस्थिती तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.