अलिबाग (धनंजय कवठेकर): अलिबाग नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या निवडणुकीतील विजय हा शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) नसून तो प्रशांत नाईक यांचा वैयक्तिक विजय असल्याची भावना अलिबागमधील जनतेतून व्यक्त होत आहे. निकालानंतर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी हा विजय पक्षाचा असल्याचा दावा केला असला, तरी स्थानिक पातळीवर हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रशांत नाईक यांनी गेल्या अनेक वर्षांत अलिबाग शहरात केलेले काम, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा विजय पक्षाच्या चिन्हामुळे नसून उमेदवाराच्या कार्यामुळे मिळाल्याचे बोलले जात आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग तालुक्यात शेकापला नामोहरम केले आहे. असे असताना अलिबाग शहरात शेकापने आपले निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलं आहे. हे कसं शक्य झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर याचं उत्तर प्रशांत नाईक असंच द्यावं लागेल. अलिबाग शहरात शेकापचे अस्तित्व टिकून आहे ते केवळ आणि केवळ प्रशांत नाईक यांच्या मुळेच हे नगर पालिका निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलं आहे.
“जयंत पाटील यांनी केलेले राजकीय गणित रायगडमध्ये चुकले आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक आणि राजकीय निरीक्षकांकडून दिली जात आहे. या निकालामुळे शेकापच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात पक्षाला स्थानिक नेतृत्वाला अधिक महत्त्व द्यावे लागेल, असेही मत व्यक्त केले जात आहे.
अलिबाग नगरपरिषद निवडणूक ही केवळ विजय-पराजयापुरती मर्यादित न राहता, स्थानिक विरुद्ध पक्षीय राजकारणाचा आरसा ठरली आहे.









