मंगेश काळोखे प्रकरणातील आरोपीला पकडून आमच्या हवाली करा !


खोपोली पोलिस ठाण्यावर महिलांचा आक्रमक मोर्चा आणि ठिय्या आंदोलन

पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी, त्यातूनच मंगेश काळोखेंना संपवले- मंत्री गोगावले

शहरात कडकडीत बंद, चौकाचौकात बंदोबस्त; अक्षरशः छावणीचे रूप 

खोपोली (प्रतिनिधी): खोपोली शहरात आज अभूतपूर्व तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे नेते मंगेश काळोखे यांच्या सोबत घडलेल्या अघटित घटनेनंतर शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या पार्श्वभूमीवर खोपोली पोलिस ठाण्यासमोर महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आरोपीला तात्काळ पकडा आणि आमच्या हवाली करा, अशी ठाम व आक्रमक मागणी आंदोलक महिलांकडून करण्यात येत होती. या आंदोलनात शिवसैनिक तसेच सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांकडून या प्रकरणात राष्ट्रवादीचा हातभार असल्याचा आरोप करत “कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी थांबू देऊ नका,” असे आवाहन पोलिसांना करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बंदोबस्त व तपासाचा आढावा घेतला. दरम्यान, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे हे स्वतः मैदानात उतरून पोलिसांच्या मदतीने जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही वेळ जमाव कोणाचेही आदेश मानण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे चित्र दिसून आले. याबाबत मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. खोपोली नगरपालिकेतील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्यानेच हा सगळा प्रकार घडल्याचा थेट आरोप गोगावले यांनी केला आहे. ‘खोपोलीतील पराभव राष्ट्रवादीला सहन झाला नाही. त्यामुळेच हा सगळा खेळ रचण्यात आला असावा,’ असे म्हणत गोगावले यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.   दरम्यान, पोलिसांची विविध पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असून शहरात सतत नजर ठेवली जात आहे. खोपोलीत सध्या तणावपूर्ण शांतता असून पुढील काही तास अत्यंत निर्णायक मानले जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खोपोली, खालापूर, कर्जत आणि रसायनी पोलीस ठाण्यांची पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत.