उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मृत मंगेश काळोखेंच्या कुटुंबाची भेट


रायगड (प्रतिनिधी):उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी दिवंगत शिवसेना नेते मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मंगेश काळोखे हे सामान्य जनतेसाठी सातत्याने काम करणारे, तळागाळातील लोकांशी नाळ जुळवून ठेवणारे कार्यकर्ते होते, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीतील पराभवानंतर अशा प्रकारे सूडबुद्धीने केलेली हिंसा अत्यंत चुकीची असून, अशी प्रवृत्ती ठेचून काढली जाईल, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, तसेच खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबीयांना व कार्यकर्त्यांना दिले. शिवसेना ही मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काळोखे यांचे नातेवाईक आणि समर्थक भावनिक झाले होते. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, चांगल्या दर्जाचा सरकारी वकील नेमावा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर केली. न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असा निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला.